Ad will apear here
Next
साहित्याची दिवाळी...


प्रत्येकाच्या दृष्टीने दिवाळी वेगळी असते. अशीच ही माझ्या स्मृतीतील एक वेगळी दिवाळी... साहित्याची! 
‘आठवणीतली दिवाळी’ सदरात साताऱ्याचे पद्माकर पाठकजी यांचा लेख...
........
कोणाची दिवाळी नवीन वस्त्र खरेदीची, कोणाची आभूषणे खरेदी करण्याची, कोणाची वास्तू घेण्याची, तर कोणाची जीवन साथीदाराच्या सहवासातील पहिली दिवाळी! कोणाची प्रिय व्यक्तीच्या ‘गमना’मुळे स्मृतींच्या प्रांगणात अश्रूभरल्या नेत्रांचीसुद्धा! प्रत्येकाच्या दृष्टीने दिवाळी वेगळी असते. अशीच ही माझ्या स्मृतीतील एक वेगळी दिवाळी... साहित्याची! 

मुंबईचे माझे मित्र, समीक्षक, लेखक रविप्रकाश कुलकर्णी मला दर वर्षी विचारतात, दिवाळी कशी साजरी करत आहेस? सुरुवातीच्या काळात मला त्यांच्या विचारण्याचा रोख कळला नव्हता. मी त्यांना विचारले, ‘तुम्ही कशी साजरी करता?’ त्यावर त्यांनी मला चार-पाच दिवाळी अंकांची नावे सांगितली आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखांबद्दल सांगितले. मला म्हणाले, ‘अरे आपली दिवाळी अशी साहित्याची दिवाळी असते. तू काय करणार आहेस?’ पंचवीस वर्षांपूर्वीचा हा प्रश्न! माझ्याजवळ समाधानकारक उत्तर नव्हते. कारण मी लिहिलेले सर्व काही ‘साभार परत’ असा शिक्का बसून माझ्या कपाटात पडून राहत होते. 

जसे गायनाच्या क्षेत्रात ‘तानसेन’ होता आले नाही, तरी ‘कानसेन’ तरी होता यावे असे म्हणतात. म्हणजे चांगले ऐकायचा छंद, सवय, आवड असावी. तद्वत साहित्याच्या क्षेत्रात उत्कृष्ट लिहिणे जमले नाही, तरी उत्कृष्ट लिहिलेले वाचण्याची आवड, छंद, सवय ही परमेश्वर कृपेने मला मूलतःच असल्यामुळे रविप्रकाश म्हणतात तशी साहित्याची दिवाळी मी माझ्या किशोरवयीन वयापासूनच लिहून नाही, पण वाचून साजरी करीत आलेलो आहे. 

माझी अशी दिवाळी अबाधित करण्यात मोठा वाटा होता व आहे अर्थात दिवाळी अंकांचा! दिवाळी अंक सजवणारे, निर्माण करणारे, केवळ पाटकर, बेहरे, अंतरकर, मो. स. साठे, इसाक मुजावर, विजय पोतनीस आदी संपादकच नव्हेत, तर दिवाळी अंकांत लिखाण करणारे, व. पु. काळे, ज्योत्स्ना देवधर, शकुंतला गोगटे, चंद्रप्रभा जोगळेकर, रणजित देसाई, बाबासाहेब पुरंदरे, भा. द. खेर, यु. म. पठाण, कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, मंगेश पाडगावकर असे अनेक लेखक-कवी माझी दिवाळी संपन्न करत आले. 

या सर्व लेखकांनी कथा, कादंबरी, लेख, कविता, आदी साहित्यप्रकारांतून मानवी मनाची भाव-आंदोलने, अनेक प्रकारच्या, स्वभावाच्या, व्यक्ती, घटना, प्रसंग अशा सुंदरपणे शब्दांतून उभे केले, की त्यामुळे दिवाळी अंक वाचनीय बनून राहिले. 

आईने किंवा बहिणीने घरी केलेल्या (विकत आणलेल्या नव्हे) आणि काकूंनी, मावशीने, मामीने, पाठवून दिलेल्या डब्यातील (प्लास्टिकच्या पिशवीतील नव्हे) दिवाळीच्या रुचकर, स्वादिष्ट फराळाच्या पदार्थांचा आस्वाद घेत घेत विविध दिवाळी अंकांचे वाचन करून मी ‘साहित्यिक दिवाळी’ साजरी करत लहानाचा मोठा झालो. माझ्या वडिलांनी पण दिवाळी अंक उपलब्ध करून देऊन माझा छंद जोपासला. 

आजही दिवाळी अंक निघतात. त्यातही साहित्य असते. लेखकांची पिढी बदलली आहे एवढेच! साहित्याच्या या दिवाळीत मी वाचक म्हणून सहभागी होतो आणि लेखक म्हणूनही माझे अल्पसे योगदान असते; पण आता दिवाळी अंकात मला घडवणाऱ्या त्या लेखकांच्या, लेखिकांच्या कथा-कादंबऱ्या नसतात. त्यातील कित्येक लेखक-लेखिका आता हयात नाहीत. कोणी थकलेले आहेत. त्यांची उणीव जाणवते. माहेर, मेनका, दीपावली, वाङ्मय शोभा, हंस, उत्तम कथा इत्यादी दिवाळी अंक व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, योगिनी जोगळेकर, आदींच्या कथा आणि लेखाविना असतात. कालगतीनुसार हे घडणारच आहे. हे मनाला समजावतो, पण हटकून आठवण येते. 

अशीच एक आठवण २००६च्या दिवाळीची! माझ्या हातात फराळाची बशी होती, पुणे वृत्तपत्राची रविवारची पुरवणी होती आणि त्यात लिहिलेला लेख माझ्या वाचनात आला. सुप्रसिद्ध लेखिका शैलजा राजे यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्याबद्दलचा तो लेख होता. आठ दशके जीवन जगणाऱ्या शैलजा राजे यांचे निधन अकाली नव्हते; पण ऐन दिवाळीत त्यांच्यावरील श्रद्धांजलीचा लेख वाचताना मन नकळत भूतकाळात गेले. बेहेरे यांचा ‘माहेर’चा दिवाळी अंक, त्यामधील कथा-कादंबरी, त्या अनुषंगाने असलेली रेखाटने, त्यामध्ये शैलजा राजे यांची कथा किंवा कादंबरी असायची. 

त्याच्याच आधीच्या वर्षात योगिनी जोगळेकरही गेल्या होत्या. वि. स. खांडेकरांच्या लेखनशैलीचा वारसा जपणारी ही लेखिकांची पिढी, आम्हाला अनेक दिवाळीत वाचनाचा अ-क्षर आनंद देऊन गेली. आणि आता ती दिवाळी त्यांच्यावरील श्रद्धांजलीचा लेख वाचण्याची होती. निसर्ग चक्रानुसार हे घडायचेच, हे लक्षात येऊनही मन अस्वस्थ झाले. जुनी वही काढून त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील टिपून ठेवलेली वाक्ये पुन्हा वाचून काढली. त्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केली. 
अशीही ती दिवाळी माझ्या आठवणीत आहे. शैलजा राजेंच्या कथेतील वाक्यातून सांगायचे तर - 

‘नाजूक भावना अंतःकरणातच राखून ठेवायच्या असतात, निर्माल्य नाही का आपण पवित्र मानीत?’

- पद्माकर पाठकजी, सातारा 
संपर्क : ८७६६८ ९२३९७

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HVZCCS
Similar Posts
दिवाळी अंक म्हणजे दिवाळी : ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांचा व्हिडिओ ‘भाऊबीजेतून मिळालेल्या पैशांतून दिवाळी अंक विकत घेण्यात वेगळीच मजा होती. एकंदरच, सर्व नाती, सर्व कला, निसर्गाचं देखणेपण आणि माणसाचा प्रत्येकाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्याला उजाळा देणारा दिवाळीचा सण त्या वेळी खूप मौलिक होता, असं वाटतं...’ ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी सांगितलेल्या आठवणींचा
दिवाळी म्हणजे सर्जनशीलता : ज्येष्ठ कलावंत माधव वझे यांचा व्हिडिओ ‘दिवाळी म्हणजे सर्जनशीलता. दिवाळी आणि घरी केलेला आकाशकंदील हे एक नातंच आहे डोळ्यात. शिवाय चुलीचा धूर.. तो तेलकट वास... फळीवरचे ते फराळाने भरलेले पितळी डबे... भरपूर पदार्थ खाऊन खाऊन झालेला खोकला..., चमनचिडी नावाचा फटाका आणि दिवाळी अंक... लहानपणची दिवाळी सुंदर होती...’ ज्येष्ठ कलावंत माधव वझे यांनी सांगितलेल्या
मातृविरहाची दिवाळी प्रत्येकाच्या दिवाळीच्या आठवणी कधीही न विसरता येण्यासारख्याच असतात आणि आनंदाच्याच असतात; पण न विसरता येण्यासारख्या दुःखाची आठवणही दिवाळीशी जोडलेली असू शकते. ‘आठवणीतली दिवाळी’ या सदरात कल्पना तेंडुलकर यांचा हा लेख तशाच एका आठवणीबद्दल...
माझा कॉर्पोरेट दिवाळसण! कॉर्पोरेट आणि वैयक्तिक आयुष्यातील पहिला दिवाळसण एकाच वेळी येण्याचा योग जुळून आल्यावर नेमकं काय घडलं, याबद्दलच्या आठवणी लिहिल्या आहेत व्यवस्थापन क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारी डॉ. अनंत सरदेशमुख यांनी... ‘आठवणीतली दिवाळी’ या सदरात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language